श्री. ओ. पी. गुप्ता, सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य
मा. श्री. ओ. पी. गुप्ता यांनी एम.एन.आय.टी., जयपूर येथून यांत्रिकी अभियांत्रिकी विषयात बी.ई. पदवी प्राप्त केली असून, ते 1992 च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. सार्वजनिक प्रशासनातील 34 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे.
मा. श्री. ओ. पी. गुप्ता हे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असताना भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त (व्यय) विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्य केले.
तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमचे महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अमरावती व सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी महानियंत्रक, एकस्व, अभिकल्प तथा व्यापार चिन्ह म्हणून पाच वर्षे कार्य केले आहे.
लोक प्रशासन, वित्त, शिक्षण, परिवहन, नागरी पायाभूत सुविधा आणि बौद्धिक संपदा प्रशासन या विविध क्षेत्रांतील व्यापक अनुभवाच्या आधारे श्री. ओ. पी. गुप्ता यांनी प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांची दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाली आहे.