बंद

    मा. न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे, न्यायिक सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य

    मा. न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांनी बी. कॉम., एल.एल.बी. या पदव्या प्राप्त केल्या असून ते मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी माहे जुलै 1984 मध्ये मुंबई येथील शहर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच महानगर दंडाधिकारी न्यायालय येथे अधिवक्ता म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली.

    दिनांक 3 सप्टेंबर 1990 रोजी त्यांनी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायिक सेवेत प्रवेश केला व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी न्यायिक सेवेत कार्य केले. माहे मे 2001 मध्ये त्यांची तदर्थ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर माहे डिसेंबर 2007 मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. त्यांनी उस्मानाबाद व सांगली येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्य केले. तसेच, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सह सचिव म्हणून आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक, मूळ शाखा व निरीक्षण म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांनी महाप्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय म्हणून देखील कार्य केले.

    मा. न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांनी जिल्हा न्यायव्यवस्थेतील न्यायिक अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेशी त्यांचा दीर्घकाळ सक्रिय संबंध असून, त्यांनी या संघटनेत सचिव, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्य केले आहे.

    दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दिनांक 1 जून 2021 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी दिनांक 23 मे 2022 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई येथे अध्यक्ष म्हणून कार्य केले.

    त्यांची दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी न्यायिक सदस्य, लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाली आहे.