वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
या कार्यालयाचे कार्यक्षेत्र कोणते?
या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.
-
या कार्यालयात तक्रार कशाप्रकारे नोंदविता येते?
या कार्यालयात तक्रार पोष्टाने, समक्ष या कार्यालयात उपस्थित राहून व आमच्या पोर्टलवरून दाखल करता येते.
-
पोर्टलवर तक्रार कशी नोंदविता येते?
आपला अर्ज घर / कार्यालयात किंवा सायबर कॅफेमधून आमच्या पोर्टलला भेट दिल्यानंतर कोणत्याही संगणकास इंटरनेट जोडल्यानंतर ऑनलाईन तक्रार दाखल करता येते.
-
या कार्यालयात तक्रार दाखल करण्याकरीता विहित नमूना आहे का?
होय. परंतू या कार्यालयात विहित नमून्यातच तक्रार दाखल करणे सक्तीचे नाही.
-
तक्रार दाखल करताना कोर्ट फ़ी ची आवश्यकता असते का?
नाही.
-
तक्रार दाखल केल्यानंतर समक्ष या कार्यलयात उपस्थित राह्ण्याची आवश्यकता आहे का?
नाही. परंतु प्रकरणी आवश्यकता भासल्यास या कार्यालयाकडून पत्र वा ईमेल पाठवून तक्रारदाराला समक्ष या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले जाते.
-
या कार्यालयात दाखल करण्यात येणाऱ्या तक्रार अर्जात कोणत्या बाबी नमूद करणे आवश्यक आहे?
तक्रार अर्जात तक्रारदाराने त्यांचे संपूर्ण नाव व पत्रव्यवहाराचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक किंवा इतर संपर्क क्रमांक, इ-मेल असल्यास इ-मेल पत्ता तक्रार अर्जावर नमूद केलेला असावा. प्रत्येक तक्रारीवर तक्रारदाराने रितसर स्वाक्षरी व जर तक्रारदार निरक्षर असेल तर दुसऱ्या एखाद्या साक्षर व्यक्तीच्या सहीने साक्षांकित केलेल्या तक्रारदार यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्वाक्षरीच्या जागी उमटविलेला असणे व आरोपाच्या तक्रारीत गैरअर्जदाराचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता व तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप नमूद करणे सक्तीचे आहे.
-
तक्रार दाखल करताना कोण-कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत?
तक्रार अर्ज सहपत्रासह दोन प्रतीत व त्यासोबत तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच आरोपाबाबत तक्रार असल्यास लोकसेवकाविरुध्द केलेल्या आरोपांच्या समर्थनीय सक्षम प्राधिकाऱ्यासमोर साक्षांकित केलेले मूळ शपथपत्र व जेवढ्या लोकसेवकांविरूध्द आरोप केले आहेत तेवढ्या तक्रार अर्जाच्या प्रती या कार्यालयास सादर करणे सक्तीचे राहील.
-
या कार्यालयात कोणाविरूध्द तक्रार दाखल करता येते?
या कार्यालयात महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम, 1971 च्या कलम 2(के) मध्ये दिलेल्या लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये नमूद केलेल्या लोकसेवकांविरूध्दच तक्रार दाखल करता येते.
-
या कार्यालयात तक्रार अर्ज किती कालमर्यादेत दाखल करता येतो?
गाऱ्हाण्याच्या तक्रारीतील कारवाई तक्रार करणाऱ्यास माहिती झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत व आरोपाच्या तक्रारीतील कारवाई केल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या तारखेपासून 3 वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी त्या कारवाईविरूध्द या कार्यालयात तक्रार दाखल करता येते. विहित कालमर्यादेत तक्रार दाखल करणे शक्य न झाल्यास विलंबाच्या पुरेशा कारणासह निवेदन तक्रार अर्जासोबत सादर केल्यास तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करण्याबाबत तरतूद केलेली आहे.
-
सादर केलेल्या तक्रारीची पुढील कार्यवाही कशी असते?
या कार्यालयात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीला तक्रार क्रमांक दिला जातो व त्यानंतर पुढील कार्यवाहीकरीता तक्रार या कार्यालयातील संबंधित कर्मचारी/ अधिकाऱ्यांकडे दिली जाते. प्रकरणी आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयाकडून अहवाल मागविला जातो व प्रसंगी काही प्रकरणी लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचेसमोर सुनावणी घेतली जाते.